जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी: वेतन अधीक्षक रियाज तडवी यांच्या मनमानीमुळे वेतन न मिळालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आता थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. थकीत वेतन तातडीने मिळावे यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले असून, पाच दिवसांत पगार न झाल्यास आमरण उपोषण सुरू करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.

शिक्षकांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोणतेही कारण नसताना त्यांचे वेतन थांबवून श्री. तडवी मानसिक छळ करत आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश नसतानाही तडवी हे उर्मटपणे ‘वेतन मिळणार नाही’ असे सांगतात. दसरा आणि दिवाळी हे महत्त्वाचे सण तोंडावर असताना वेतनाअभावी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून आजपासून पाच दिवसांच्या आत थकीत वेतन अदा न झाल्यास, प्रशासनाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शांततापूर्ण आमरण उपोषण केले जाईल, असे निवेदन शिक्षकांनी दिले आहे. या गंभीर मागणीमुळे जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.




