चाळीसगाव प्रतिनिधी । येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक (सिग्नल पॉईंट) येथील त्रिकोणातील नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा या मागणीसाठी संभाजी सेनेतर्फे शिवजयंती रोजी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कधीपासूनच पाठपुरावा
शहरातील सिग्नल पॉइंट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा या मागणीसाठी संभाजी सेनेने अनेक वर्षांपासून विविध आंदोलने करीत पाठपुरावा करून पत्रव्यवहार करून रचनात्मक अशी आंदोलने करून सातत्याने लढा सुरुच ठेवला आहे. प्रारंभ शासनाच्या सर्व संबंधित विभागांना पत्रव्यवहार करून उपोषण सुरू केले होते. ते उपोषण २१ दिवस सुरू राहिले त्यानंतर नगरपालिका निवडणुकीवेळी प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सभेसाठी आले असता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झालाच पाहिजे असा जयघोष करीत फलक झळकावले होते त्यावेळी त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्याकरिता रोज एक याप्रमाणे सलग ३१ दिवस ३१ स्मरणपत्रे रजिस्टर पोस्टाने त्यांना पाठविली होती. पुन्हा त्यानंतर मा मुख्यमंत्र्यांचे या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी होम हवन आंदोलन देखील केले होते. त्यानंतर भूमिपूजन आंदोलन देखील करण्यात आले होते तसेच पुन्हा १९ सप्टेंबर २०१८ पासून दर महिन्या च्या १९ तारखेला याप्रमाणे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी अशी सलग पाच महिने महाआरती आंदोलन देखील नियोजित जागेवर करण्यात आले असून १८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही तर दिनांक १९ फेब्रुवारी २०१९ शिवजयंती दिनी संभाजी सेनेचे महाराष्ट्रभरातील कोणतेही १२१ संभाजी सैनिक नियोजित पुतळ्याच्या जागेवर आत्मदहन करतील असा इशारा आता देण्यात आला आहे.
निवेदन दिले
दरम्यान, या प्रसंगी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणार्या कोणत्याही परिस्थितीत किंवा संभाजी सैनिकांच्या किंवा शिवप्रेमींच्या जीविताचे काही कमी-जास्त झाल्यास त्यास सर्वस्वी आपण स्वतः आणि आपले शासन आणि प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन आज संभाजी सेनेने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, स्थानिक आमदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी, जळगाव पोलीस अधीक्षक, तहसीलदार चाळीसगाव, मुख्याधिकारी नगरपरिषद चाळीसगाव व पोलीस निरीक्षक चाळीसगाव या व इतर सर्व संबंधित कार्यालयांना देण्यात आले आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी संभाजी सेना तालुकाध्यक्ष गिरीश पाटील शेतकरी आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेंद्र महाजन प्रदेश संघटक सुनील पाटील शहराध्यक्ष अविनाश काकडे शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष बापूराव पाटील तालुका उपाध्यक्ष संदीप जाधव,महेंद्रसिंग राजपूत, नारायण पाटील विजय देशमुख गणेश पाटील रवी पाटील ऋषिकेश मोरे अमर भोई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.