यावल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथे आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या केळी प्रशिक्षण वर्गात पनामा या केळीवरील अत्यंत घातक बुरशीजन्य रोगाबाबत शेतकरी बांधवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. प्रा. विजयराज गुजर यांनी मार्गदर्शन करताना स्पष्टपणे सांगितले की, एकदा शेतजमिनीत पनामा रोगाचा संसर्ग झाल्यास ती जमीन किमान तीन वर्षे उत्पादनक्षम राहत नाही. त्यामुळे केळी उत्पादकांनी या रोगापासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

पनामा रोग हा फ्यूझेरियम ऑक्सीस्पोरम फॉर्मा स्पेशालिस क्युबेन्स नावाच्या मातीतील बुरशीमुळे पिकांवर होत असतो. फ्यूझेरियम विल्टचा हा एक प्रकार असून उष्णकटिबंधीय हवामानात हा रोग फार वेगाने पसरतो. विशेषतः संवेदनशील केळी जातींमध्ये त्याचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून येतो. प्रा. गुजर यांनी सांगितले की, केळीच्या कोवळ्या मुळांवर या बुरशीचा प्रारंभिक प्रादुर्भाव होतो. त्यानंतर संसर्ग राईझोम म्हणजेच मुळांसारख्या खोडांपर्यंत पोहचतो आणि नंतर जलद गतीने पानाच्या तळावर व मुळांच्या साठयांवर आक्रमण करतो.

या रोगाचा एक मोठा धोका म्हणजे संसर्ग झालेल्या जमिनीत पुढील तीन वर्षे कोणत्याही प्रकारे केळीचे उत्पादन घेणे कठीण जाते. त्यामुळे वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य जमिनीची निवड, संशोधित प्रतिकारक्षम वाणांची लागवड आणि योग्य सेंद्रिय व्यवस्थापन याकडे लक्ष द्यावे, असेही प्रा. गुजर यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमात केळी लागवडीबाबत प्रा. किरण जाधव यांनी आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर प्रा. अंजली मेढे यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण वर्गाला शेतकरी वर्गाचा उदंड प्रतिसाद लाभला. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सभापती राकेश फेगडे, माजी सभापती नारायण चौधरी, कृउबा संचालक हर्षल पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक उमेश फेगडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे केळी संशोधन केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्र, जळगाव यांचे मोलाचे योगदान होते. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना नवीन माहिती, रोग व्यवस्थापन आणि उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने नवचैतन्य मिळाले.



