वर्धा प्रतिनिधी । ब्रॉडगेज मेट्रो वर्धा ते नागपूर धावणार असून हे अंतर आता अवघ्या 35 मिनिटांत पार करता येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. वर्धा येथे महायुतीचे उमेदवार पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत गडकरींनी या ब्रॉडगेज मेट्रोची घोषणा केली.
वर्ध्यातही विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजप आपला गड राखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. भाजपने वर्ध्याचे विद्यमान आमदार पंकज भोयर यांनाच यंदाही उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारासाठी वर्ध्याच्या भगतसिंग मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरींनी भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला, तसेच भविष्यातील योजनांचीही माहिती दिली.
वर्धा-नागपूर ही ब्रॉडगेज मेट्रो धावणार आहे. ती वर्धा, गोंदिया, रामटेक, सावनेर, नरखेड आणि पुढे नागपूर होत ब्रह्मपुरी, वडसापर्यंत ही ब्रॉडगेज मेट्रो असेल. या मेट्रोच्या माध्यमातून 120 च्या गतीने 35 मिनिटांत वर्ध्याहून नागपूरला पोहचता येणार आहे. यामुळे नागपुरात नौकरी करणाऱ्या वर्धेतील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. शिवाय, यातील काही डब्यांमध्ये शेतकऱ्यांना दूध, भाजीपाल्यासह इतर साहित्यही नेता येणार असल्याने त्यांचाही फायदा होईल, असे गडकरी यांनी सांगितले. इथेनॉलची आज 5 हजार कोटींची उलाढाल असून येत्या काळात 50 हजार कोटींची उलाढाल केली जाणार आहे. देशात मोठ्या प्रमाणात बदल आवश्यक असून बायो इंधनच्या माध्यमातून हे बदल करता येणार आहे. कचऱ्याला भाव आहे, पण साखरेला भाव नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे साखर उत्पादन करणाऱ्या कारखान्यात बदल करून त्यापासून इंधन तयार केले जाणार आहे. यामुळे पुढील काळात या इंधनाचा वापर करुन वाहने रस्त्यावर धावतील. पेट्रोल डिझेलच्या तुलनेत हे इंधन स्वस्त असल्याने ते फायद्याचे ठरणार आहे, असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
यावेळी मंचावर पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, खासदार रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, आमदार पंकज भोयर यांच्यासह भाजप शिवसेनेचेही अनेक पदाधिकारी उपस्थित होते.