मुंबई प्रतिनिधी | एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांशी संबंध असून त्या क्रूझवर एक दाढीवाला ड्रग माफिया आपल्या बंदुकधारी प्रेयसीसोबत होता असा खळबळजनक दावा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांनी केला आहे.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले की, समीर वानखेडे, वानखेडेंचे चालक आणि प्रभाकर साईल यांचा सीडीआर तपासावा. त्यांच्या सीडीआरमधून सगळा घटनाक्रम समोर येईल. एनसीबीने आता तत्काळ पावलं उचलावीत. प्रभाकरने व्हिडीओद्वारे सगळा घटनाक्रम समोर आणलाय. या प्रकरणाच्या खोलात जाण्याची गरज आहे. विशेष म्हणजे क्रूझ पार्टीची महाराष्ट्र पोलिसांकडून परवानगी घेतलेली नव्हती, असंही नवाब मलिक म्हणाले.
क्रूझवरच्या ड्रग्ज पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाचा सहभाग होता. हा तोच दाढीवाला आहे, जो समीर वानखेडेंचा मित्र आहे, असा धक्कादायक आरोप नवाब मलिक यांनी केला. क्रूझवरील पार्टीचं सीसीटीव्ही फुटेज मागवावं. त्याची प्रेमिका बंदूकीसह क्रूझवर होती. एका व्हिडीओत ती डान्स करताना दिसून येत आहे. क्रूझवरील पार्टीचं सीसीटीव्ही समोर आणा, सगळं सत्य समोर येईल असं ते म्हणाले.
माझा लढा हा धर्माविरोधात नाही तर त्यांनी कशा चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवलीय, हे मला सगळ्यांसमोर आणायचंय. खोटा जातीचा दाखला घेऊन त्यांनी पद्धतीने नोकरी मिळवली, हा माझा स्पष्ट आरोप आहे. एक दलित व्यक्ती झोपडीत राहून युपीएससीची तयारी करत होता. त्याची नोकरी समीर वानखेडेने हिसकावून घेतली आहे. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी. अशा बोगसगिरीविरोधात ३ ते ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, मला विश्वास आहे की त्यांची नोकरी नक्की जाईल.
मी दाखवलेला जातीचा आणि जन्माचा दाखला जर खोटा असेल तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असा पुनरुच्चार मलिक यांनी करताना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने याची चौकशी करावी, अशी मागणीही मलिक यांनी केली.