मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नागरिकांना विविध प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी होणाऱ्या मोठ्या खर्चाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आतापर्यंत विविध प्रकारची प्रमाणपत्रे काढण्यासाठी प्रत्येक अर्जासोबत नागरिकांना ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. मात्र, आता हे शुल्क पूर्णतः रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे महागाईने पिचलेल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यासह शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा चालू असून निकालानंतर विद्यार्थ्यांना आणि पालकांना विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता भासते. आतापर्यंत सर्व प्रमाणपत्रांसाठी ३ ते ४ हजार रुपयांचा खर्च येत होता. मात्र, या निर्णयामुळे पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. यापुढे कसलेही मुद्रांक शुल्क न भरता केवळ स्वसाक्षांकित अर्ज लिहून तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळू शकणार आहे.
हा निर्णय फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर इतर अनेक शासकीय कामांसाठीही प्रमाणपत्रे आवश्यक असतात. त्यामुळे हा निर्णय राज्यातील कोट्यवधी नागरिकांसाठी लाभदायी ठरणार आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाला या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी आपल्या एक्स (माजी ट्विटर) अकाऊंटवर यासंदर्भात अधिकृत पोस्ट करत याची घोषणा केली आहे.