मालेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज तुमचे पोलीस असले तरी उद्या आमचे असतील २०२४च्या निवडणुकीपर्यंत थांबा तुम्ही नक्कीच जेलमध्ये जाणार ! अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मालेगाव न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. यावरील सुनावणीसाठी आज संजय राऊत हे मालेगाव न्यायालयात उपस्थिती होते. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दादा भुसे यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले.
याबाबत संजय राऊत म्हणाले की, अद्वय हिरे यांना अटक म्हणजे राजकीय सुडाची कारवाई यालाच म्हणतात. खरं तर दादा भुसेंनी तुरुंगात जायला पाहिजे होते. गिरणा साखर कारखाना बचाव समितीच्या नावाखाली दादा भुसे यांनी पैसे घेतले. शेकडो पावत्या माझ्याकडे आहेत, १७८ कोटी रक्कम मोठी आहे. हिरे कुटुंब शिवसेनेसोबत आहे, म्हणून ही कारवाई झाली. असा गंभीर आरोप राऊतांनी यावेळी केला.
दरम्यान, याप्रसंगी संजय राऊत यांनी दादा भुसे यांना इशारा देखील दिला. ते म्हणाले की,
आज पोलीस तुमचे आहेत, उद्या आमचे असतील. २०२४ ला सगळ्या तक्रारींची दखल घेतली जाईल, हिशोब मागितला जाईल. २०२४ पर्यंत थांबा, ज्या जेलमधे अद्वय हिरे आहेत त्याच जेलमध्ये दादा भुसे जातील, असा इशारा राऊतांनी दिला.