अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खान्देशातील ज्येष्ठ साहित्यिक तात्यासो वा.रा. सोनार यांच्या स्मृती दिनानिमित्त चेतन सोनार यांनी “वाचन संस्कृती मुलांमध्ये रुजावी आणि त्यांचे जीवन आनंदी व्हावे” या उद्देशाने जैतपूर येथील माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेस पुस्तक भेट दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल आणि त्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळेल.
तात्यासो वा.रा. सोनार यांच्या चेतश्री प्रकाशनामुळे अनेक नवोदित लेखकांना लिखाणाची संधी मिळाली. अमळनेरच्या वैचारिक वारशाला पुढे नेण्यात आणि टिकवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. अनेक दिग्गज लेखक आणि विचारवंतांची विचारशिदोरी अमळनेरच्या जनतेला लाभली आहे. साने गुरुजींच्या “खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” या विचारांना कृतीत आणणारे हे कुटुंब असून ग्रामीण भागातील मुलांचे विविध विषयांवरील ज्ञान वाढावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने “वाचू या आनंदे, जगूया आनंदे” हा उपक्रम राबवून तात्यासो यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
“आपण हा लिखाणाचा वारसा जपूया, वाचा, शब्द जोडा आणि व्यक्त व्हा,” असे सांगत साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या कार्यवाह दर्शना पवार यांनी तात्यासो यांच्या योगदानाचे स्मरण केले. या उपक्रमात मिळालेल्या सुंदर पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने उजळले. जैतपूर माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी तसेच मुख्याध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारा हा उपक्रम भविष्यातही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.