मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक अखेर निश्चित झाली आहे. येत्या मंगळवारी म्हणजे उद्याच (24 सप्टेंबर) या अधिसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. पाठिमागील दोन वर्षांपासून ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रखडली होती. राज्य सरकारच्या हस्तक्षेपामुळे या ना त्या कारणाने वारंवार निवडणूक स्थगित होण्यावर मुंबई उच्च न्यायालयानेच बडगा उगारला. त्यामुळे अखेर मतदानाचा मुहूर्त ठरला. या निवडणुकीसाठी पदवीधर मतदारसंघातून एकूण 10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात आहेत. आपापले उमेदवार निवडूण आणण्यासाठी विद्यार्थी संघटना सक्रीय झाल्या आहेत. शेवटच्या टप्प्यातही मतदारांना संपर्क करण्याचे काम सुरु आहे.
मुंबई विद्यापीठ आदिसभा निवडणूक 2024 साठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मैदानात आहे. असा थेट सामना या निवडणुकीत रंगणार आहे. असे असले तरी, छात्रभारती, बहुजन विकास आघाडी हे गट काही जागा लढवत आहेत. शिवाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची युवासेना (शिंदेगट) हे देखील मैदानात आहेत. मात्र, त्यांनी थेट उमेदवार उभे केले नाहीत.
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी या आधी रविवारचा दिवस निश्चित करण्यात आला होता. मात्र, निवडणूक अचानक स्थगित करण्यात आली. आता 24 सप्टेंबर ही नवी तारीख जाहीर केली आहे. या तारखेस मंगळवार येत आहे. मगळवार हा नियमीत कामाचा दिवस असतो. रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. परिणामी हातातले काम सोडून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येणार का? याची चिंता उमेदवारांना सतावते आहे. तरीदेखील सर्व मतदारांपर्यंत संपर्क करणे त्यांना मतदानास येण्यासाठी प्रवृत्त आणि तशी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एवढे करुनही मतदारांनी पाठ फिरवली तर मात्र, अनेक मातब्बर उमेदवारांना धक्का बसू शकतो.
दरम्यान, या आधी सन 2018 मध्ये सिनेट निवडणूक पार पडली होती. त्या वेळीसुद्धा 10 जागांसाठीच मतदाना पार पडले होते. मात्र, तेव्हा 68 उमेदवार रिंगणात होते. त्या निवडणुकीचे वैशिष्ट्य असे की, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्या वेळच्या अखंड युवासेनेने बाजी मारली होती. सर्वच्या सर्व जागा सेनेने जिंकल्या होत्या. आताही युवासेना आणि भाजपने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मतदार त्यांना कसा प्रतिसाद देतात याबाबत उत्सुकता आहे.