जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात निवडणुकींचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला. यानुसार २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. परंतू २१ ऑक्टोबरला ‘पोलीस हुतात्मा दिन’ असतो. त्यामुळे मतदानाच्या बंदोबस्ताची सर्वात मोठी भिस्त असणाऱ्या पोलिसांना आपल्याच शहीद बांधवाना त्यादिवशी मानवंदना कशी द्यायची? असा प्रश्न पडलाय. आम्ही बंदोबस्त करणार की, आमच्या शहीद बांधवाना मानवंदना देणार?,असं म्हणत अनेक पोलीस अधिकारी, कमर्चारी याबाबत खाजगीत नाराजी व्यक्त करत आहेत.
पोलीस हुतात्मा दिनाचा इतिहास
लदाखमधील भारताच्या सीमेवर २१ ऑक्टोबर १९५९ रोजी बर्फाच्छादित व निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी गस्त घालणाऱ्या १० पोलीस जवानांवर दबा धरून बसलेल्या चीनी सैनिकांनी अचानक हल्ला चढविला होता. या हल्ल्यात पोलीस जवानांनी चीनी सैनिकांशी कडवी झुंज दिली. परंतु दुर्देवाने या हल्ल्यात सर्व पोलीस शहीद झाले होते. या वीर जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी तसेच कर्तव्य आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी, म्हणून शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशभर ‘पोलीस हुतात्मा दिन’ म्हणून पाळला जातो.
प्रत्येक राज्यात वर्षभरात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिस बांधवांना या दिवशी आदरांजली अर्पण करण्यात येते. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित मानवंदना परेडच्यावेळी शहीद झालेल्या पोलिसांची नावे वाचून दाखविली जातात. परंतू मतदानाच्या एक दिवस आधीपासूनच बूथवर बंदोबस्त लागतो. अगदी या काळात मोठ्या पासून मोठ्या अधिकाऱ्यासह बाबू लोकांना देखील बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरावे लागते.
पोलीस म्हटला की, आपल्याला फक्त ट्राफिकवाला हवालदार आठवतो. त्यामुळे सीमेवरील सैनिकाप्रमाणे पोलीसही शहीद होतो? ही बाब अनेकांना पचनी पडत नाही. पण मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शौर्य दाखवणारे, गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या चकमकीत शहीद होणारे देखील पोलीसच असतात. अर्थात पोलीस प्रशासन काही राखीव कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यादिवशी हा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतीलच. पण अशा दिवसाची मतदानासाठी निवड होणे, दुर्दैवी असल्याचे मत अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी खाजगीत व्यक्त करताय.