बंगळुरु (वृत्तसंस्था) कर्नाटक विधानसभेच्या 15 मतदारसंघात पोटनिवडणूकीसाठी आज मतदान पार पडत आहे. तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी 17 जणांना अपात्र ठरवल्यानंतर ही निवडणुक होत आहे. दरम्यान, १५ पैकी 8 मतदारसंघात विजय न मिळाल्यास भाजपचे राज्यातील सरकार कोसळू शकते.
गोकाक, अथणी, कागवाड, शिवाजीनगर, यशवंतपूर, महालक्ष्मी लेआउट ,के .आर. पूरम, होसकोटे, चिक्कबळळापूर, विजयनगर, हिरेकेरुर, राणीबेन्नूर, हुनसूर, यल्लापूर या मतदारसंघात आज मतदान होत आहे. याठिकाणी 165 जण आपले नशीब आजमावत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या 15 पैकी 8 मतदारसंघात भाजपला विजय मिळवणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास कर्नाटकातील येडीयुरप्पांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकार कोसळू शकते. इथे पुन्हा काँग्रेस आणि जेडीएस सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात. विधानसभेचे सभापती रमेश कुमार यांनी जुलै 2019 मध्ये मोठा निर्णय घेत काँग्रेस- जेडीएसच्या 14 बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द केले. त्याआधी तिघांना निलंबित करण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या 17 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कायम ठेवला मात्र, पुन्हा निवडणूक लढवण्याची परवानगी दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या निकालावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. सत्ताधारी भाजपला किमान आठ जागा जिंकाव्या लागणार असून, त्यांना रोखण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसनेही जोर लावला आहे.