नवी मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभेच्या ठाणे आणि सातारा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे राजन विचारे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. अगोदर २३ एप्रिल रोजी साताऱ्यात मतदान करा, त्यानंतर २९ एप्रिल रोजी नवी मुंबईत राजन विचारे यांना मतदान करा, असा अजब सल्ला बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला आहे. याविरोधात मंदा म्हात्रे यांच्यावर निवडणक आयोगाकडून आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवेसनेचे ठाण्यातील उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी कोपरखैरणे येथे मेळाव्याचे आयोजन कऱण्यात आले होते. या परिसरात सातारा आणि शिरुर मतदारसंघातील नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. ते पाहता युतीच्या या मतदारसंघातील उमेदवारांसाठीही हा मेळावा होता. मंदा म्हात्रे यांना आपली चूक लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील असाच सल्ला यापूर्वी दिला होता असं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मंदा म्हात्रे यांच्या विधानाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ऐरोली विभागाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.