पश्चात्ताप करावा लागू नये यासाठी मतदान करा : मोदी

pm modi reuters 1

नवी दिल्ली (प्रतिनिधी) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना जागरुक करा, मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांना केले आहे. ब्लॉगच्या माध्यमातून जनतेला मतदार नोंदणी केली नसेल तर आजच करा असे सांगत आपले एक मत देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असून भविष्यात पश्चात्ताप करावा लागू नये यासाठी मतदान करा,असेही मोदी यांनी म्हटले आहे.

 

आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॉग देखील लिहला आहे. त्याचसोबत टिविट्ररवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, विरोधी पक्षांचे नेते, सर्व राज्यातील मुख्यमंत्री, क्रिडा क्षेत्रातील खेळाडू, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, गायक यांना मतदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करा असे आवाहन केले आहे. नरेंद्र मोदींनी आपल्या ब्लॉगमध्ये चार गोष्टींना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. यामध्ये मतदार यादीत नाव नोंदणी, आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची तपासणी करणे, मतदानादिवशी इतर कोणताही प्लॅन न करणे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरणा देणे यांचा उल्लेख आहे.

 

नरेंद्र मोदी यांनी ब्लॉगमध्ये पुढे म्हटले आहे की, मतदानाचा अधिकार वापरुन आपण देशाच्या विकासाचं स्वप्न साकारु शकतो. देशात असे वातावरण बनवले गेले पाहिजे की, मतदान करणे गर्व आणि अभिमानास्पद वाटले पाहिजे. विशेषत: जे यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांच्यासाठी निवडणूक आणि मतदान करणे हा लोकशाहीचा उत्सव बनला पाहिजे. मतदान न करणाऱ्या व्यक्तीच्या मनात पश्चातापाची भावना निर्माण व्हायला हवी. देशात काही चुकीचे घडत असेल तर देशातील प्रत्येक व्यक्तीने स्वत:ला जबाबदार धरले पाहिजे, जर मी मतदान केले असते तर माझ्या देशावर संकट आले नसते याच विचाराने मतदान करा. स्वत:ही मतदान करा आणि दुसऱ्यालाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करा असं आवाहन देशातील प्रत्येक नागरिकाला केले आहे.

Add Comment

Protected Content