सातारा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । साताऱ्याच्या भूमीवर होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. पुण्यात पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला असून, साहित्यविश्वातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
पुण्यात सकाळी अकरा वाजता झालेल्या साहित्य परिषदेत विविध शाखांमधून आलेल्या प्रतिनिधींनी अध्यक्षपदासाठी आपापल्या शिफारशी मांडल्या. चर्चेत प्रामुख्याने विश्वास पाटील, रंगनाथ पठारे, बाळ फोंडके यांची नावे होती. ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांना देखील या पदासाठी विनंती करण्यात आली होती, मात्र त्यांनी आधीच नकार दिल्याने पाटील यांची निवड अटळ मानली जात होती. अखेर बैठकीमध्ये त्यांच्याच नावावर एकमताने निर्णय झाला.

विश्वास पाटील हे मराठी साहित्यविश्वातील एक ख्यातनाम आणि बहुचर्चित कादंबरीकार आहेत. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय विषयांवर आधारित अनेक कादंबऱ्या लिहिल्या असून, ‘पानिपत’ ही त्यांची सर्वात प्रसिद्ध आणि वाचकप्रिय कादंबरी आहे. या कादंबरीतून त्यांनी ऐतिहासिक संशोधन, नाट्यमय चित्रण, आणि भाषेची विलक्षण ताकद यांचा उत्तम मिलाफ साधला आहे.
‘पानिपत’सारख्या महाकाव्यात्मक कादंबरीसाठी पाटील यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक संशोधन केले होते. तत्कालीन दस्तऐवज, ऐतिहासिक पत्रव्यवहार, ग्रंथसंपदा आणि स्थळदर्शनाच्या आधारे त्यांनी कथानकात वास्तवतेची झलक निर्माण केली आहे. त्यांची लेखनशैली वाचकांना केवळ कथा सांगत नाही, तर त्या कालखंडात घेऊन जाते.
पाटील यांच्या भाषाशैलीचे सौंदर्य म्हणजे लालित्य आणि ताकदीचा संतुलित वापर. ऐतिहासिक पात्रांचे मानसिक द्वंद्व, राजकीय कटकारस्थानं, आणि युद्धाचे थरारक प्रसंग त्यांनी अशा पद्धतीने मांडले आहेत की वाचक त्या घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचा भास होतो. ‘पानिपत’मधील सदाशिवराव भाऊ, अहमदशहा अब्दाली, नाना फडणीस, मल्हारराव होळकर यांचे जिवंत व्यक्तिचित्रण हे त्यांच्या लेखनाचे मोठे वैशिष्ट्य ठरले आहे.
विश्वास पाटील यांची अध्यक्षपदावर निवड होणं म्हणजे केवळ एका साहित्यिकाचा सन्मान नाही, तर मराठी ऐतिहासिक कादंबरी लेखन परंपरेचा गौरव आहे. साताऱ्यासारख्या ऐतिहासिक शहरात होणाऱ्या या साहित्य संमेलनाला त्यांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळेच वजन आणि विचारप्रवाह मिळेल, असा विश्वास मराठी साहित्यवर्तुळात व्यक्त होत आहे.



