नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजस्थानमधल्या गुर्जर समाजाने छेडलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आंदोलकांनी धोलपूरमध्ये दगडफेक आणि गोळीबार करत तीन गाड्यांची जाळपोळही केली आहे. धोलपूरच्या दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गाला जाम केल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्यानंतर जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. त्यावेळी पोलिसांनीही हवेत गोळीबार केला.
आंदोलकांनी दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केल्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. जमावानेही पोलिसांच्या अंगावर दगड भिरकावले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर आंदोलक चंबलकडे पळाले. राजस्थानमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी गुर्जर समुदायाने रेल रोकोही केला होता. गुर्जरांनी राजस्थान राज्यात नोकरी आणि शिक्षणात 5 टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे.