पॅरीस-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने ५० किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली. मात्र, अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. यानंतर विनेश फोगाटची प्रकृती बिघडली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. डीहायड्रेशनचा त्रास होत आल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली भारतीय ठरली. मात्र अंतिम सामन्याआधी विनेश फोगाट अपात्र ठरली आहे. विनेश फोगाट ५० किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती.
मात्र तिचे वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे.
विनेश फोगाटचे वजन जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून रात्रभर हालचाली सुरु होत्या. मात्र, बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले.