जळगाव, लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी : समाजातील विविध प्रश्नांवर धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून सक्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते विनायक किशोर पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शहराध्यक्षपदी अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे यांच्या विशेष मान्यतेने विनायक पाटील यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले.
विनायक पाटील यांनी आजवर धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवले आहेत. तळागाळातील लोकांशी असलेला त्यांचा संपर्क आणि संघटन कौशल्य पाहून पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना विनायक पाटील म्हणाले की, “पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला मी पूर्णपणे जागण्याचा प्रयत्न करेन. युवकांच्या न्याय्य हक्कासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर राहून पक्षसंघटना वाढवण्यावर भर देईन.” या निवडीनंतर राजकीय आणि सामाजिक अशा सर्वच स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



