मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात शिवसंग्रामचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांचे निधन झाले आहे.
विनायक मेटे यांच्या कारने मागून एका अवजड वाहनाला धडक दिल्याचे समोर आले आहे. हा अपघात मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडल्याचे समजते. यात खुद्द विनायक मेटे यांच्यासह त्यांचा ड्रायव्हर आणि अंगरक्षक हे तिन्ही जण गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या अपघातात मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी वाहिन्यांना दिलेल्या माहितीनुसार ते सर्वजण बीडवरून मुंबईच्या दिशेने येत असतांना हा अपघात घडला. अपघात झाल्यानंतर सुमारे एक तासापर्यंत त्यांना कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नाही. अखेर एका वाहनचालकाने त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या अपघाती निधनामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.