मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथे दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या एका इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून २० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्याच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अर्जुन जनार्दन कोळी (वय ३०, रा. घोडसगाव, ता. मुक्ताईनगर) हा गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवण्याच्या उद्देशाने फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याची माहिती घेतली असता तो घोडसगाव-मुक्ताईनगर मार्गावरील प्रेम प्रतिक टी सेंटर जवळ असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतले. झडती दरम्यान त्याच्याकडे विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी तत्काळ त्याला अटक करून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलीस हवालदार प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र कापडणे आणि रविंद्र चौधरी यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईसाठी जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
या घटनेमुळे मुक्ताईनगर आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी कठोर पावले उचलल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.