जळगाव प्रतिनिधी । येथील जैन इरिगेशनचे चित्रकार विकास मल्हारा यांना मुंबईच्या आर्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे आयोजित १०३व्या राष्ट्रीय चित्र प्रदर्शंनात “रावबहाद्दूर एम.व्ही.धुरंधर बेस्ट एक्झिबिट पेंटींग पुरस्कार” त्यांच्या “अनटायटल्ड-२” या चित्राला मिळाला आहे.
कोविड-19 प्रादुर्भाव कारणाने खबरदारी म्हणून सदरील पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाला. चित्रकार विकास मल्हारा यांनी मुंबईच्या प्रसिद्ध एस.एल.रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधून जी.डी.आर्ट (उपयोजित) ही पदविका संपादन केली आहे. ते अमूर्त शैलीतील चित्रकार आहेत. त्यांच्या चित्रातील आकार वास्तव नसले तरी रंग, रंगलेपन, पोतातून तशी जाणीव करून देतात. त्यांची चित्रे जमिनीशी व भूतकाळातील आठवणींशी जुळलेली असतात, टेकडीवरून दिसणारे दूरपर्यंतचे निसर्ग वजा आकार चित्रात पहायला मिळतात. दूरपर्यंत पसरलेली शेती, मधूनच वाहणारे पाण्याचे झरे, दिसणारे कातळ, दिसणारी झाडे वेगवेगळ्या रंगात फुललेली दिसतात, चित्रात दिसणारे रंग, आकार आणि चित्रातला अवकाश, हा त्यांनी आपल्या चित्रातून दाखवलेला आहे. चित्रात (नाद) ध्वनी ऐकावा असे ही तरल चित्र. रंग बोलतात, आकार खेळतात आणि कॅनव्हासवर सुंदर प्रतिमा उतरते असे ते आवर्जून नमूद करतात. कवी मनाचे चित्रकार विकास यांना श्रद्धेय पद्मश्री डॉ.भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांचे नेहमी प्रोत्साहन राहिले. चित्रकार स्व.वसंत वानखेडे, प्रभाकर कोलते, वासुदेव कामत, प्रकाश वाघमारे, राज शिंगे, प्राचार्य राजेंद्र महाजन आणि राजू बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या चित्रांची अखराबरी व्हर्च्युल इंटरनॅशनल प्रदर्शन, बांग्लादेश व टागोर इंटरनॅशनल-भोपाल साठी देखील निवड झाली. हे तिन्ही सन्मान प्राप्त झाल्याने विकास मल्हारा यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासहित कला जगतातील मान्यवरांनी तसेच कला रसिकांनी विशेष अभिनंदन केले आहे.