जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा विभागातील कर्मचारी अरविंद पंडित सोनवणे यांनी महाविद्यालयीन कर्मचाऱ्याचे १२ हजार रुपयांचे हरविलेले पैशांचे पाकिट प्रामाणिकपणे परत करुन अजूनही प्रामाणिकपणा समाजात कायम असल्याचे दाखवून दिले.
तळोदा येथील समाजकार्य महाविद्यालयाचे लेखापाल संजय पटेल हे सोमवारी विद्यापीठात कार्यालयीन कामासाठी आले होते. त्यांच्या खिशातून पैशाचे पाकीट परीक्षा विभागात हरविले. स्वत: पटेल यांना पाकीट हरविल्याची कल्पना नव्हती. परीक्षा विभागाच्या तीसऱ्या मजल्यावरील लिफ्ट जवळ विद्यापीठातील कर्मचारी अरविंद सोनवणे यांना हे पाकिट सापडले. त्यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांच्या कार्यालयात ते जमा केले. पाकिटातील व्हिजीटिंग कार्डवर नमूद केलेल्या मोबाईलवर संजय पटेल यांच्याशी संपर्क साधुन त्यांना कार्यालयात बोलावून घेण्यात आले तो पर्यंत पाकीट हरविल्याची पटेल यांना देखील कल्पना नव्हती. संचालक बी.पी.पाटील व अरविंद सोनवणे यांनी श्री पटेल यांच्याकडे हे पाकिट हस्तांतरीत केले या पाकिटात १२ हजार रूपये, एटीएम आणि महत्वाची कागदपत्रे होती. सोनवणे यांच्या प्रामाणिकपणा बद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतूक केले.