जळगाव प्रतिनिधी । कुठलेही संकट येण्याआधी त्याच्याशी लढण्यासाठी पूर्व तयारी केली तर आपल्याला संकट आल्यावर विजयी लढाई करून यश मिळवता येते. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेसाठी तसेच म्युकरमायकोसीस आजाराशी लढायला आपण मनुष्यबळ प्रशिक्षण व साधन सामुग्रीने सज्ज राहिल्यामुळे वेळेवर आजार आटोक्यात आणता आले. परिणामी बरे होऊन घरी जाणारे रुग्ण अधिक प्रमाणात होते, असे प्रतिपादन येथील अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बालरोग व चिकित्साशास्त्र विभागातर्फे कोरोना महामारीच्या संभाव्य पुढील लाटेत लहान मुलांना असणारा संभाव्य धोका या पार्श्वभूमीवर पहिला टप्पा म्हणून परिचारिका संवर्गाचे चार दिवशीय प्रशिक्षणाचे उदघाटन अधिष्ठाता डॉ रामानंद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर उपअधिष्ठाता डॉ. अरुण कसोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ बाळासाहेब सुरोशे, अधिसेविका प्रणिती गायकवाड आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणाचे उदघाटन मान्यवरांनी दीपप्रज्ज्वन करून केले. प्रस्तावनेत डॉ. सुरोशे यांनी प्रशिक्षण घेण्यामागील उद्देश सांगत बालरोग विभाग तिसऱ्या लाटेसाठी कसा सज्ज आहे, त्याची माहिती दिली. अधिसेविका गायकवाड यांनी सांगितले की, वैद्यकीय सेवेमध्ये परिचारिका संवर्गाची भूमिका महत्वाची असते. परिचारिकांनी सतत अद्ययावत राहून रुग्णसेवेचा दर्जा अधिक उंचावला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद पुढे म्हणाले की, संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर उपलब्ध असून कक्ष देखील तयार आहे. आता बालरोग विभाग पूर्ण सक्षम होण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे आहे. त्यासाठी विभागातील प्रत्येक बाबींची माहिती परिचारिका संवर्गाला असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणामधून डॉक्टरांकडून परिपूर्ण अद्ययावत माहिती घेऊन सर्व मिळून संभाव्य संकटाचा सामना करून रुग्णांना उत्तम सेवा देऊया, असेही ते म्हणाले.
सूत्रसंचालन डॉ. वृषाली सरोदे व डॉ विश्वा भक्ता यांनी तर आभार डॉ. बाळासाहेब सुरोशे यांनी मानले. यावेळी प्र. प्रशाकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, डॉ. इम्रान तेली, डॉ. अतुल गाजरे, डॉ. गिरीश राणे, डॉ. अखिलेश खिलवाडे, डॉ. निलांजना गोयल आदी उपस्थित होते.