खामगावात बर्निंग कारचा थरार: उभ्या कारने घेतला पेट

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । खामगाव शहरातील पोलीस कोविड सेंटर परिसरात उभ्या असलेल्या कारने आज दुपारी दोनच्या सुमारास अचानक पेट घेतला.

खामगाव मधील बारादरी भागातील पोलीसांच्या वसाहतीजवळील कोविड सेंटर परिसरात उभ्या असलेल्या कारला आज दुपारी अचानक आग लागली होती. धुराचे लोळ उठत असल्यामुळे परिसरातील नागरीकांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्याठिकाणी गाडीने पेट घेतलेला त्यांना दिसून आला. नागरिकांनी त्वरीत अग्निशमक विभागाशी संपर्क साधला व याची माहिती अग्निशामक दलाला दिली. मात्र अग्निशमक दल उशीरा घटनास्थळी पोहोचल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते व परिसरात उभी असलेली कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. कारमधील गॅसकिटमधून ज्वलनशील गॅसची हळूहळू गळती होऊन अकस्मात आगीने भडका घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सदर कार ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या नीलसिंग चव्हाण यांची असल्याची माहिती मिळाली आहे तर गाडीचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले आहे. रावण टेकडीवरून अग्रिशमक दलाला शहरात येण्यास नेहमी उशिर होतो. रस्त्यामध्ये काही ठिकाणी स्पिड ब्रेकर सुध्दा लावलेले आहेत. त्यामुळे वाहन घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याच्या काही घटना झाल्या आहेत.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!