जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज एक्सक्लुझीव्ह रिपोर्ट | माजी खासदार उन्मेष पाटील हे आपल्या सहकार्यांसह मोठा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असून लवकरच ते लवकरच शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश करण्याचे संकेत मिळाल्याने जिल्ह्यात मोठी राजकीय उलथा-पालथ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेषदादा पाटील यांची कामगिरी चांगली असतांना देखील त्यांचे तिकिट कापल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. भाजपमधील अंतर्गत संघर्षातून उन्मेषदादांचा गेम करण्यात आल्याची चर्चा आता होत आहे. खुद्द उन्मेष पाटील यांनी आपल्याला पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे जाहीर केले असले तरी ते उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झालेले नाहीत. स्वत: उन्मेष पाटील अथवा त्यांच्या सौभाग्यवती संपदाताई पाटील यांना शिवसेना-उबाठा पक्षाकडून उमेदवारी मिळेल असे मानले जात आहे. मात्र अचानक यात करण पवार यांची एंट्री झाली. त्यांनी शिवसेना-उबाठाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट देखील घेतली.
दरम्यान, कालपासून राजकीय घडामोडी गतीमान झाल्या असून उन्मेष पाटील व करण पवार हे आपल्या समर्थकांसह मुंबईत डेरा टाकून बसलेले आहेत. आज दुपारी त्यांची मातोश्रीवर अंतीम चर्चा होणार असून त्यांचा शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश होणार आहे. यानंतर जळगावसाठी उमेदवारी जाहीर होणार आहे. या माध्यमातून भारतीय जनता पक्षातील तरूण फळीतील आघाडीचे नेते मानले जाणारे हे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवबंधन हाती बांधणार असल्याचे आता स्पष्ट संकेत मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.