जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चंदीगढ विद्यापीठ, मोहाली येथे सुरु असलेल्या अखील भारतीय आंतर विद्यापीठ भारोत्तोलन (वेट लिफ्टींग) स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या खेळाडूंनी दोन रौप्य आणि एक कास्य पदक प्राप्त केले.
दि.८ ते १२ मार्च या कालावधीत ही स्पर्धा चंदीगढ विद्यापीठात होत आहे. ५५ किलो गटात उदय महाजन (व्ही.एस.नाईक महाविद्यालय, रावेर), ६१ किलो गटात गोविंदा महाजन (व्ही.एस.नाईक महाविद्यालय, रावेर) या दोन खेळाडूंनी रौप्य पदक प्राप्त केले. तर अभिषेक महाजन (व्ही.एस.नाईक महाविद्यालय, रावेर) या खेळाडूने ६७ किलो गटात कास्य पदक प्राप्त करुन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची वेगळी छाप या स्पर्धेत उमटविली.
संघाचे प्रशिक्षक म्हणून डॉ.गोविंद मारतळे आणि संघ व्यवस्थापक म्हणून डॉ.मुकेश पवार काम पहात आहेत. विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्रभारी कुलसचिव प्रा. किेशोर पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांनी या यशाबद्दल खेळाडूंचे आणि प्रशिक्षक व व्यवस्थापक यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान शुक्रवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत देखील या यशाबद्दल अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला अशी माहिती क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांनी दिली.