Home क्राईम गोवंशाची वाहतूक करणारे वाहन पकडले ; एकाला अटक, दोन फरार.

गोवंशाची वाहतूक करणारे वाहन पकडले ; एकाला अटक, दोन फरार.


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात गोवंशाची अवैध आणि अत्यंत निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या टोळीवर सावदा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला रंगेहात ताब्यात घेतले असून, त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. पोलिसांनी या कारवाईत ७ गोवंश आणि वाहन असे एकूण ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सावदा पोलीस ठाण्यातील हवालदार सिकंदर तुकडू तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी हे पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप (क्र. MH 39 C 7305) मधून गोवंशाची अवैध वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून ही गाडी अडवली असता, त्यामध्ये अत्यंत क्रूरपणे ७ गोवंश कोंबलेले आढळले. या जनावरांचे हात-पाय आणि गळे दोरीने घट्ट बांधलेले होते, जेणेकरून त्यांना हालचाल करता येऊ नये. कोणत्याही प्रकारचा चारा-पाणी किंवा पुरेशी जागा न देता या जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने ने-आण केली जात होती.

या प्रकरणी पोलिसांनी आवेश असलम शेख (वय २५, रा. गौसीयानगर, सावदा) याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. मात्र, त्याचे साथीदार सलीम पठाण (रा. फैजपूर) आणि शफीक व्यापारी (रा. वरणगाव) हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. संशयित आरोपींविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान जप्त केलेले गोवंश सध्या सुरक्षित असून, पोलिसांनी त्यांना पुढील देखभालीसाठी तातडीने गौशाळेत जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोहेकॉ संजीव चौधरी करत आहेत.


Protected Content

Play sound