जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात अद्याप ऑटोमेटेड व्हेईकल फिटनेस टेस्टिंग सेंटर (AVTS) सुरू न झाल्यामुळे व्यावसायिक वाहनधारकांची मोठी कोंडी झाली असून, फिटनेस प्रमाणपत्रासाठी इतर जिल्ह्यांत जावे लागत असल्याने आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा ट्रक असोसिएशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
जिल्ह्यात AVTS केंद्र उपलब्ध नसल्यामुळे ट्रक, बस व इतर व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी वाहनधारकांना थेट नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागत आहे. या प्रक्रियेत इंधन खर्च, टोल, वाहनांची अतिरिक्त धावपळ, वेळेची नासाडी तसेच व्यवसायाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. एका फिटनेस प्रमाणपत्रासाठी दोन ते तीन दिवस वाया जात असून, याचा थेट फटका वाहतूक व्यवसायावर बसत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आरटीओ कार्यालयाबाहेर झालेल्या धरणे आंदोलनात ट्रक असोसिएशन व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत AVTS केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी केली. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पूर्वीप्रमाणे मॅन्युअल पद्धतीने फिटनेस चाचणी सुरू ठेवावी किंवा अधिकृत संक्रमण कालावधी जाहीर करावा, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, शासनाने राज्यात AVTS प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी जळगावसारख्या मोठ्या जिल्ह्यात केंद्र सुरू न होणे हे अन्यायकारक आहे. यामुळे केवळ वाहनधारकच नव्हे तर चालकांनाही रोजगाराच्या बाबतीत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा फिटनेस नसल्यामुळे वाहने रस्त्यावर उतरवता येत नसून, उत्पन्नावर त्याचा परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील टप्प्यात आरटीओ कार्यालयात सर्व व्यावसायिक वाहने जमा करून मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जळगाव जिल्हा ट्रक असोसिएशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.



