जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या दिशेने वाटचाल करताना केंद्र सरकारने “विकसित भारत 2047” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने निश्चित दिशा आणि प्रयत्नांना गती देणे असा असून, या उपक्रमाला देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधून व्यापक प्रतिसाद मिळवून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
“विकसित भारत 2047” ही संकल्पना केवळ आर्थिक विकासापुरती मर्यादित नसून, सामाजिक, पर्यावरणीय आणि प्रशासनिक क्षेत्रातील सुधारणांचा समावेश करून भारताला एक अग्रगण्य जागतिक शक्ती म्हणून उभे करण्याचा संकल्प या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. यामध्ये तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, त्यांच्या सहभागातूनच देशाला नवा दिशा मिळू शकतो, या विचाराने “विकसित भारत राजदूत युवा कनेक्ट” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने या कालावधीत “विकसित भारत संवाद” या ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या माध्यमातून महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी शिबिरे, युवा संवाद कार्यक्रम, पर्यावरण जनजागृती, शहीद भगतसिंह जयंती निमित्त व्याख्याने, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांविषयी आणि हिंदवी स्वराज्याविषयी माहिती देणारे विशेष कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
विशेषत: 25 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत “एक दिन, एक घंटा, एक साथ” या उपक्रमाद्वारे संपूर्ण राज्यात आणि देशभरात नागरिकांनी एकत्र येऊन श्रमदान करावे, अशी सूचना विद्यापीठे आणि महाविद्यालयांना देण्यात आली आहे. या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा उद्देश म्हणजे तरुणाईमध्ये देशाच्या विकासदृष्टीकोनाची रुजवणूक करणे, सामाजिक भान जागृत करणे आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचा सक्रीय सहभाग सुनिश्चित करणे हा आहे, असे सहसंचालक, उच्च शिक्षण, जळगाव विभागाचे डॉ. पराग मसराम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.



