भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वरणगाव शहराजवळून वाहणार्या भोगावती नदीचे खोलीकरण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर नगराध्यक्ष व त्यांच्या सहकार्यांनी आपल्या उपोषणाची सांगता केली.
भोगावती नदीपात्र उथळ झाल्याने पावसाळ्यात पडणारे अथवा पुराचे पाणी जमिनीत न जिरता वाहून जाते. यामुळे वरणगाव शहराची भूजल पातळी घटली आहे. यामुळे महामार्ग प्राधिकरणाकडून नदीचे खोलीकरण सुरू झाले होते. पहिल्या टप्प्यात सात मोरी पूल ते स्मशानभूमीपर्यंत खोलीकरण झाले. मात्र, काही जणांमुळे याचे काम बंद पडले. हे काम पुन्हा सुरू करावे, यासाठी नगराध्यक्ष काळे व नगरसेवकांनी सोमवारी नदीपात्रात उपोषणाला सुरुवात केली. उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेविका माला मेढे, नसरीनबी कुरेशी, मेहनाजबी पिंजारी, अल्लाउद्दीन शेख, माजी सभापती राजेंद्र गुरचळ, शेख सईद शेख भिकारी, इरफान पिंजारी, साजिद कुरेशी, अजय पाटील, ज्ञानेश्वर घाटोळे, संजय धनगर यांनी उपोषणाला पाठिंबा दिला. मुख्याधिकारी बबन तडवी, वरणगावच्या एपीआय सारिका कोडापे, महसूल मंडळाधिकारी वैशाली पाटील यांनी १५ मे पासून पोलिस संरक्षणात नदी खोलीकरणाचे काम सुरू होईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर या उपोषणाची सांगता करण्यात आली.