जळगाव प्रतिनिधी । वरणगाव येथील पाणी पुरवठा योजनेला दिलेली स्थगिती राज्य सरकारने उठविली असून यामुळे येथील नागरिकांची तहान भागणार आहे. या प्रकरणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.
वरणगाव येथील २५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला दिलेली स्थगिती राज्य सरकारने उठवली. त्यामुळे या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लागला, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
आधीच्या युती सरकारच्या काळात ही २५ कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली; परंतु सरकार बदलानंतर सर्वच योजनांना स्थगिती देण्यात आली होती. या पाणीपुरवठा अत्यावश्यक सेवा असल्याने या योजनेला मान्यता मिळावी यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार या योजनेवरील स्थगिती उठवण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पाणीपुरवठा, मलनिस्सारण, रस्ते प्रकल्पापैकी ज्या प्रकल्पांचे कार्यादेश ५ डिसेंबर २०२० पूर्वी देण्यात आले नव्हते. हे अशा प्रकल्पांचे कार्यादेश पुढील आदेशापर्यंत देण्यात येऊ नये अशा सूचना शासनाने ५ डिसेंबरला दिल्या होत्या.
सुधारित सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात आली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्यास कार्यादेश देण्याचे व निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास ती पूर्ण करून कार्यादेश देण्याची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश नगरविकास विभागाचे सहसचिव पां. जो. जाधव यांनी दिले आहे. योजना मंजूर करण्यात आल्याने पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.