वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील थकबाकीदारांवर आता नगरपालिकेने कडक कारवाईचा बडगा उगारला असून कर वसुलीसाठी प्रशासन पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’वर आले आहे. वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या मालमत्ताधारकांची नावे आता सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात येणार असून त्यांच्या घरांचा पाणीपुरवठाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील विविध करांची तब्बल ६८ लाख रुपयांची थकबाकी वसूल करणे अपेक्षित असताना नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे. त्यामुळे आता २५ हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या नागरिकांना विशेषतः लक्ष्य करण्यात आले असून ते सर्व पालिकेच्या रडारवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर दहा प्रभागांमध्ये स्वतंत्र वसुली पथके नेमण्यात आली असून ती घराघरांत जाऊन कर वसुलीची मोहीम राबवत आहेत.

नगरपालिकेने थकबाकीदारांची नावे शहरातील प्रमुख चौक, सूचना फलक, तसेच सार्वजनिक ठिकाणी बॅनरवर प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच संबंधितांच्या पाणीपुरवठ्यावरही गदा आणण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांनी दिली. वसुली अधिकारी चव्हाण आणि कार्यालयीन अधीक्षक राशिद नौरंगाबादी यांनी सांगितले की, यापूर्वी तोंडी आणि लेखी सूचना देऊनही कर भरण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
चालू आणि मागील वर्षांचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांविरोधात आता कठोर पावले उचलली जात असून, प्रशासनाने कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरातील १०० प्रमुख थकबाकीदारांची नावे पहिल्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणी व समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतरही थकबाकी न भरल्यास संबंधित मालमत्तांवर जप्तीची कारवाई तसेच बोजा चढवण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
पालिकेच्या माहितीनुसार, मालमत्ता कर हा शहराच्या विकासाचा कणा आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे आणि इतर मूलभूत नागरी सुविधा याच करातून पुरवल्या जातात. मात्र, मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिल्यामुळे विकासकामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून त्वरित कर भरणा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
२५ तारखेपासून वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून, नियमांनुसार कठोर कारवाई टाळण्यासाठी सर्व थकबाकीदारांनी नगर परिषद कार्यालयाशी संपर्क साधून तातडीने थकबाकी भरावी, अन्यथा नाव सार्वजनिक झाल्यानंतर होणाऱ्या सामाजिक प्रतिष्ठेच्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांनी दिला आहे.



