
मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आगामी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण रूप गाण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे.
यापूर्वी शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’चे केवळ पहिले दोन श्लोक गायले जात होते. मात्र, आता ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत संपूर्ण गीत गाण्याची सक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या सात दिवसांत सर्व शाळांमध्ये पूर्ण गाणे गायले जाईल. त्यानंतर हा उपक्रम कायम ठेवायचा की नाही, याबाबत सरकार पुढील निर्णय घेईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
या आदेशानुसार, दिवंगत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेल्या ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रदर्शनांचे आयोजनही करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना या राष्ट्रगीताची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्याचे स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्व समजावे यासाठी प्रत्येक शाळेला ‘वंदे मातरम्’च्या इतिहासावर आधारित प्रदर्शन आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
या मोहिमेसंदर्भातील संदर्भपत्र शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले असून सर्व शैक्षणिक संस्थांनी आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. या काळात विद्यार्थ्यांच्या सहभागातून देशभक्तीपर घोषवाक्ये, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ‘वंदे मातरम्’वर आधारित स्पर्धा देखील आयोजित केल्या जाणार आहेत.



