Home टेक्नोलॉजी वंदे भारत एक्स्प्रेसचा 10 ऑगस्टला शुभारंभ; शेगांवलाही मिळाला थांबा!

वंदे भारत एक्स्प्रेसचा 10 ऑगस्टला शुभारंभ; शेगांवलाही मिळाला थांबा!


बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेचा बहुप्रतीक्षित शुभारंभ 10 ऑगस्ट रोजी होणार आहे. विशेष बाब म्हणजे या जलदगती रेल्वेला आता संत गजानन महाराजांच्या पावन स्थळी, शेगांवमध्येही थांबा मिळाला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शेगांव येथील भाविकांसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मागणीसाठी प्रयत्न करणारे केंद्रिय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

सुरुवातीच्या नियोजनात नागपूर, अजनी, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंडमार्गे पुणे असे या वंदे भारत एक्स्प्रेसचे थांबे निश्चित करण्यात आले होते. मात्र शेगांव या संत नगरीला थांबा मिळावा यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी वैष्णव यांची भेट घेऊन भाविकांच्या वतीने ही मागणी लावून धरली. शेगांव येथील गजानन महाराज संस्थान आणि तेथे दररोज होणाऱ्या देशभरातील भाविकांच्या आगमनाविषयी माहिती देऊन या स्थानकाला थांबा देण्याचे महत्त्व पटवून दिले.

या मागणीनंतर 7 ऑगस्ट रोजी रेल्वे बोर्डाचे निदेशक संजय निलम यांच्या स्वाक्षरीने अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले, ज्यामध्ये शेगांव स्थानकाला थांबा देण्याची घोषणा करण्यात आली. नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस 884 किमीचे अंतर अवघ्या 10 तासांत पूर्ण करणार असून, ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे. नागपूरहून सकाळी 9.50 वाजता सुटणारी ही रेल्वे, वर्धा, बडनेरा, अकोला मार्गे शेगांव येथे दुपारी 1.20 वाजेच्या सुमारास थांबेल. तर पुण्याहून परतीच्या प्रवासात दुपारी 2.45 वाजता ही गाडी शेगांवमध्ये थांबणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस ही भारतीय बनावटीची, आधुनिक सुविधांनी युक्त आणि जलद गतीने धावणारी रेल्वे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशभरात विविध वंदे भारत मार्ग उभारण्यात येत आहेत. नागपूर-पुणे हा मार्ग हे त्याचे आणखी एक महत्त्वाचे उदाहरण ठरले आहे. या रेल्वेमुळे दोन्ही शहरांतील व्यापार, उद्योग, शिक्षण आणि पर्यटन वाढीस मदत होणार आहे.

शेगांवला मिळालेल्या थांब्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय आता दूर होणार असून, या ऐतिहासिक निर्णयामुळे रेल्वे प्रशासनावर संत भक्तांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.


Protected Content

Play sound