पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेच्या फुटीर आमदारांच्या विरोधात आक्रोश वाढत चालला असून आज तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयात शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे.
तानाजी सावंत हे भूम-परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते एकनाथ शिंदे यांच्या बंडातील एक प्रमुख मोहरे आहेत. त्यांनी आधीच शिवसेनेतील खदखद जाहीरपणे व्यक्त केली होती. याकडे उध्दव ठाकरे यांनी दुर्लक्ष केले. यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गेले आहेत. गुवाहाटीतील हॉटेलमध्ये ते उत्साहात घोषणा करतांना देखील दिसून आले होते.
दरम्यान, आज आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयात तोडफोड करण्यात आली. हे कार्यालय भैरवनाथ शुगर मिलचे असून येथे आमदार बर्याचदा बसत असत. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली. याप्रसंगी तानाजी सावंत हे गद्दार असल्याच्या घोषणा दिल्या. ते इतर गद्दारांनाही हेच भोगावे लागणार असल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिल्या.