Home प्रशासन तहसील वंचित बहुजन आघाडीचे मुक्ताईनगर तहसीलदारांना निवेदन

वंचित बहुजन आघाडीचे मुक्ताईनगर तहसीलदारांना निवेदन


मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात जाणीवपूर्वक न घेतल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मुक्ताईनगर तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.

26 जानेवारी रोजी नाशिक येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव टाळण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा प्रकार केवळ चूक किंवा विसर नसून संविधान, बाबासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण आंबेडकरी समाजाचा जाणीवपूर्वक केलेला अपमान असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. या घटनेदरम्यान वनविभागातील कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सापुरे यांनी कार्यक्रमस्थळी निर्भीडपणे आवाज उठवून जाब विचारल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानामुळेच देशात संविधान, लोकशाही, समानता आणि स्वातंत्र्य अबाधित आहे. अशा महामानवाचे नाव प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात न घेणे म्हणजे संविधानाचा तसेच दलित-वंचित समाजाचा अपमान असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे कोट्यवधी आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या असून महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता, बौद्ध समाज, संविधानप्रेमी नागरिक आणि पुरोगामी विचारसरणी मानणाऱ्या सर्व घटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना, बौद्ध समाज बांधव, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिक यांच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष दिलीप पोहेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार गिरीश वखारे तसेच पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करून तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

या निवेदनावर संजय धुंदले, सुभाष शिरसोदे, प्रमोद पोहेकर, राजू पानपाटील, संजय म्हसाने, मनोज पोहेकर, पवन वानखेडे, राहुल वाघ, योगेश शिरसोदे, अमर शिरसोदे, रवींद्र चव्हाण, भागवत चव्हाण, भगवान वाघ, गोपाळ धुंदले, महेंद्र शिरसोदे, संध्या हिरोळे आदींच्या सह्या असून प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


Protected Content

Play sound