जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची सहविचार सभा आज मंगळवारी (१४ ऑक्टोबर) उत्साहात पार पडली. नव्याने नियुक्त जिल्हाध्यक्ष ईश्वर पंडितराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. पक्ष बांधणी, आगामी निवडणुका आणि सदस्य नोंदणीसंबंधी विविध निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, वंचित बहुजन आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका या स्वबळावर लढवणार आहे. तसेच, समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचाही विचार होईल, मात्र भारतीय जनता पक्षाशी कोणतीही आघाडी केली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

ईश्वर पाटील पुढे म्हणाले की, येत्या दोन ते तीन महिन्यांत वाडा, वस्ती, गाव आणि तालुकास्तरावर वंचित बहुजन आघाडीचा प्रचार-प्रसार केला जाईल. तसेच सर्व तालुके आणि शहरांमध्ये नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला जाणार असून, सदस्य नोंदणी अभियानालाही गती दिली जाईल. पक्ष संघटनेचे बळ वाढवण्यासाठी सर्व सदस्यांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाध्यक्षांनी पुढे सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीच्या गोलानी मार्केट येथील कार्यालयात किंवा स्वतः जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधावा. या निवडणुका समाजातील वंचित, बहुजन आणि शोषित घटकांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी महत्त्वाच्या ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला सल्लागार प्रमोद इंगळे, जिल्हा महासचिव ऍड. रवींद्र ब्राह्मणे, जिल्हा महासचिव अमित तडवी, अमोल कोल्हे, प्रवीण सपकाळे, जमीर शेख, अनिल लोंढे, हरिश्चंद्र सोनवणे, मधुकर तांदळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



