( प्रतिकात्मक संग्रहीत छायाचित्र )
भुसावळ प्रतिनिधी । येथील गजानन महाराज सेवा ग्रुपतर्फे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी शहरातील भाविकांचा जत्था रवाना झाला आहे.
नर्मदा परिक्रमा म्हणजे सर्वात कठीण व खडतर परिक्रमा आहे ज्यांना ही परिक्रमा करायची फार इच्छा आहे परंतु प्राकृतिक अथवा संसारिक अडचणीमुळे ही परिक्रमा करता येत नाही, त्यांच्या साठी उत्तरवाहिनी परिक्रमा हा उत्तम पर्याय आहे. एखादी नदी ज्या वेळेस उत्तरवाहिनी होते त्यावेळेस ती फार पवित्र मानली गेली आहे. यानुसार नर्मदा मैया तिलकवाडा ते रामपुरा या क्षेत्रात फक्त चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी होत असल्यामुळे त्या परिसराला फार पवित्र मानतात. नर्मदा पुराण व स्कंद पुराणामध्ये उल्लेख केल्या प्रमाणे जो कुणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल त्याला पूर्ण नर्मदा परिक्रमेचे फळ मिळेल असे नमूद केले आहे.त्यामुळे चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करतात. ही परिक्रमा करण्यासाठी प्रथम तिलकवाडा येथे यावे लागते. संकल्प विधी करून आपली परिक्रमा पहाटे उत्तरतटावरून सुरु होते ,वाटेत लागणारी मंदिरे व आश्रम ह्यांना भेट देत आपला साधारण १० किलोमीटरचा टप्पा पूर्ण होतो .उत्तर तट संपल्यावर नावेने दक्षिण तटावर म्हणजे रामपुरा येथे यावे लागते येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून नर्मदामैयाचे जल घेऊन घाटावरील तीर्थेश्वर महादेव मंदिरात पिंडीवर जल अर्पण करून आपली दक्षिण तटाची परिक्रमा चालू होते. दक्षिण तट संपल्यावर नावेंने पुन्हा उत्तर तटा वर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते अशी ही २१ किलोमीटरची एक दिवसाची परिक्रमा आहे.
या परिक्रमेसाठी ७ रोजी रात्री भाविक रवाना झाले असून ते ८ एप्रिलला तिलकवाडा येथे पोहचणार आहेत. ९ एप्रिल रोजी परिक्रमा सुरू होणार आहे. दरम्यान, रविवारी रात्री भाविक नर्मदा परिक्रमा यात्रेस रवाना झाले. याप्रसंगी गाड्यांचे पूजन जय गजानन सेवा ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष दिनेश गवळी आणि सचिव कौस्तुभ देवधर यांच्या हस्ते करण्यात आले.
पहा : नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमेबाबतचा हा व्हिडीओ.