जळगाव प्रतिनिधी । पाण्याचा योग्य वापर केला तरच भविष्यात भारत सुजलाम-सुफलाम राहिल अन्यथा वाळवंट होईल अशी भिती रा.स्व. संघाचे सरकार्यवाहक भौय्याजी जोशी यांनी व्यक्त केली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पर्यावरण व भूशास्त्र प्रशाळा आणि औरंगाबाद येथील महात्मा फुले कृषि प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंवाद या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन भौय्याजी जोशी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते. समारोपाच्या सत्रात बोलताना भौय्याजी जोशी म्हणाले की, पाण्याचा शोध घेण्यासाठी आजची कार्यशाळा आहे. पाणी सर्वांना आणि पुरेसे तसेच शुध्द मिळायला हवे ही अपेक्षा आहे. पाण्यावर सजीवांचा मूलभूत हक्क आहे. पाणी ही कधीही विक्रीची गोष्ट असू शकत नाही. पाण्यासाठी मोठया योजना सरकारने केल्याच पाहिजेत. परंतू केवळ सरकारवर अवलंबून न राहता छोटया प्रमाणात विकेंद्रीत व्यवस्था सामाजिक संस्थांमार्फत पाणी प्रश्नावर उभ्या राहत असतील तर त्यांना शासनाने प्रोत्साहन द्यावे, सहकार्य द्यावे. भविष्यात पाण्याच्या नियोजनासाठी नदीजोड योजनेचा विचार हा करावाच लागणार आहे.
भैयाजी जोशी पुढे म्हणाले की, पाण्याचा उपयोग करताना तो संयमाने केला पाहिजे. शिवाय पाणी संतुलित वापरता आले पाहिजे आणि समन्वयीत प्रयत्न झाले पाहिजेत. निसर्गाच्या संपदेवर केवळ आपला अधिकार नाही. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी पाण्याबाबत साक्षरता येणे गरजेचे आहे, असे सांगून दुष्काळात टिकाव धरतील अशी काही बियाणे कृषी अभ्यासकांनी तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, प्रत्येक गावात पाणी प्रश्नावर काम करणारे कार्यकर्ते तयार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. बीजभाषणात डॉ.उपेंद्र कुलकर्णी (पश्चिम क्षेत्र सेवा प्रमुख) यांनी पाणी साठे निर्माण होणे पुरेसे ठरणारे नाही तर त्याला सामुहिक स्वरुप देण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. समाजाला पाण्याबाबत काही नियम पाळण्यासाठी भाग पाडावे लागेल असे सांगून पाण्यातून श्रीमंत होणारे समाज मन आपण निर्माण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मंचावर रा.स्व.संघाचे देवगिरी प्रांत संघचालक मधुकर जाधव, महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज कंक, पर्यावरणशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.एस.टी.इंगळे, कार्यशाळेचे समन्वयक डॉ.एस.एन.पाटील उपस्थित होते. श्री.भौय्याजी जोशी यांच्या हस्ते सेवावर्धिनी पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
प्रा.एस.एन.पाटील यांनी प्रास्ताविक केले. रा.स्व.संघाचे देवगिरी प्रांत जलगतीविधी प्रमुख सर्जेराव वाघ यांनी कार्यशाळेची भूमिका विशद केली. यावेळी पाणी प्रश्नावर काम करणारे जौन उद्योग समुहाचे अतुल जौन,आर.एस.पाटील (भुसावळ), अॅड.प्रदीप देशमुख व नरहरी शिवपूरे (औरंगाबाद), बाबुराव केंद्रे व सतीश कावळे (नांदेड), दत्तात्रय तावडे (पाचोरा), लक्ष्मीताई फालक, देशबंधु व मंजूगुप्ता फौंडेशनचे आणि पाणी फौंडेशनचे प्रतिनिधी यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उद्घाटनानंतरच्या सत्रात प्रा.दत्तात्रय रेगुलवार यांनी वातावरणातील बदलांमुळे पर्जन्यांवर होणार परिणाम, प्रा.शाम लोहार यांनी भू-आच्छादन व भू-वापर, उल्हास परांजपे यांनी कमी किमतीत पाणी साठवण व कमी किमतीचे बंधारे आणि अरुण घाटे यांनी फेरासिमेंट बंधारा या विषयावर माहिती दिली. त्यानंतरच्या सत्रात राजेंद्र दहातोंडे व सागर धनाड यांनी नेसू नदी व माथा ते पायथा काम केल्याने होणारे बदल याविषयी संवाद साधला. त्यानंतर प्रश्नोत्तरे व अनुभव कथन झाले. डॉ.आशुतोष पाटील आणि सुहास अजगावकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. प्रा.व्ही.एम.रोकडे यांनी आभार मानले.