नवीदिल्ली, वृत्तसंस्था | भारत आणि अमेरिकेमध्ये लष्करी संबंध बळकट होत असून भारत लवकरच अमेरिकेबरोबर नवीन संरक्षण करार करणार आहे. या करारांतर्गत भारताला अमेरिकेकडून सी गार्डीयन आर्म्ड ड्रोन्स, पाणबुडीविरोधी पी-८आय आणि टेहळणी विमाने मिळणार आहेत. हा संपूर्ण करार सात अब्ज डॉलर्सचा आहे.
“अमेरिकेकडून मिळणाऱ्या सी गार्डीयन आर्म्ड ड्रोन्समध्ये भारतीय नौदल, एअर फोर्स आणि लष्कराला आपल्या गरजेनुसार काही बदल करुन हवे आहेत. त्यासाठी त्यांची चर्चा सुरु आहे.” अशी माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही देशांच्या सरकारादरम्यान हा करार होणार आहे. ट्रम्प प्रशासनाने यावर्षी जून महिन्यात भारताला मिसाइल आणि अन्य शस्त्रांसह आर्म्ड ड्रोन्स विकण्यास मंजुरी दिली. तिन्ही सशस्त्र दलांमध्ये आधी फक्त नौदलाला खरेदीमध्ये इच्छा आहे असे वाटत होते. पण आता तिन्ही सैन्य दलांनी खरेदीची इच्छा प्रगट केली आहे असे सूत्रांनी सांगितले.
नौदलासाठी दहा पाणबुडी विरोधी पी-८आय आणि दीर्घ पल्ल्याची टेहळणी विमाने खरेदी करण्याचाही विषय आहे. यामुळे भारतीय नौदलाकडे असलेल्या १२ विमानांच्या ताफ्यामध्ये भर पडणार आहे. टेहळणी विमाने खरेदी करण्याचा व्यवहार तीन अब्ज डॉलर्सचा आहे. शेजारी चीन आणि पाकिस्तान सारखे देश असताना सद्य स्थितीत भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही नवीन शस्त्रास्त्रे महत्वाची आहेत.