सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथे हिंदू–मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुफी संत हजरत पीर बालेशा बाबा रहेमतुल्लाह अलै सरकार यांचा उर्स सोहळा यंदाही पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या उर्स यात्रेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असून, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवणारा हा सोहळा पंचक्रोशीत विशेष महत्त्व राखून आहे.
हजरत पीर बालेशा बाबा दर्गा हे पंचक्रोशीतील जातीय सलोखा व एकात्मता जपणारे एकमेव तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते. हिंदू–मुस्लिम एकता उर्स कमेटीच्या वतीने ५, ६ आणि ७ जानेवारी २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत या उर्स यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्षाच्या प्रारंभीच या यात्रेला सुरुवात होत असल्याने परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होते.

दि. ५ जानेवारी रोजी हजरत पीर बालेशा बाबा यांच्या दर्ग्यावर चादर व संदल शरीफ मोठ्या धुमधडाक्यात आणि मिरवणुकीने चढविण्यात येणार आहे. या मिरवणुकीत विविध समाजातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होऊन बाबा प्रती आपली श्रद्धा व्यक्त करणार आहेत. दि. ६ जानेवारी रोजी रात्री कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, मुंबई येथील प्रसिद्ध सुफी गायक कौसर साबरी आणि भोपाळ येथील प्रख्यात गझल गायिका निशाद नाज साबरी यांच्यात रंगतदार कव्वाली मुकाबला होणार आहे.
दि. ७ जानेवारी रोजी पारंपरिक कुस्ती स्पर्धा व कुस्ती सामने आयोजित करण्यात येणार असून, या स्पर्धांना परिसरातील कुस्ती शौकिनांचा मोठा प्रतिसाद मिळतो. उर्स काळात नवसाला पावणारे संत म्हणून ओळख असलेल्या हजरत पीर बालेशा बाबा यांच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक दर्ग्यावर दाखल होतात.
उर्स व संदलच्या निमित्ताने मोठा वाघोदा बुद्रुक येथे भव्य यात्रा भरते. तीन दिवसांच्या या यात्रेदरम्यान ग्रामस्थ व भाविकांकडून दर्गा परिसरात तसेच विविध ठिकाणी लंगर, भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यामुळे सामाजिक बांधिलकी, सेवा भावना आणि आपुलकीचे दर्शन घडते.
हजरत पीर बालेशा बाबा यांचा उर्स सोहळा राज्यभरात सुप्रसिद्ध असून, धार्मिक श्रद्धेसोबतच सांस्कृतिक एकतेचा संदेश देणारा मानला जातो. हजारोंच्या संख्येने भाविक या उर्स यात्रेत सहभागी होत असल्याने परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण होते.
हिंदू–मुस्लिम एकतेचा आदर्श जपणाऱ्या या उर्स सोहळ्यात जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा तसेच कव्वाली व सांस्कृतिक कार्यक्रमांचा मंत्रमुग्ध आनंद घ्यावा, असे आवाहन हिंदू मुस्लिम एकता उर्स कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.



