नवी दिल्ली-वृत्तसेवा | भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPI आता जागतिक स्तरावर वेगाने लोकप्रिय होत आहे. NPCI ने इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ दरम्यान भारत मंडपम येथे परदेशी पाहुण्यांसाठी ‘UPI वन वर्ल्ड’ वॉलेट सेवा सुरू केली आहे.
या सेवेच्या माध्यमातून आता परदेशी पर्यटक आणि प्रतिनिधींना भारतात पेमेंट करण्यासाठी भारतीय मोबाईल नंबर किंवा स्थानिक बँक खात्याची गरज भासणार नाही.

‘UPI वन वर्ल्ड’ हे परदेशी प्रवाशांसाठी तयार केलेले प्रीपेड डिजिटल वॉलेट आहे. परदेशी नागरिक पासपोर्ट आणि व्हिसाच्या आधारे नोंदणी करू शकतात. त्यानंतर ते त्यांच्या देशातील कार्ड किंवा चलन वापरून वॉलेटमध्ये पैसे भरू शकतात आणि QR कोड स्कॅन करून भारतातील कोणत्याही दुकानदाराला सहज पेमेंट करू शकतात.
ही सेवा नवी दिल्ली विमानतळ आणि भारत मंडपम येथे उपलब्ध आहे. पाहुण्यांना CheqUPI अॅप डाउनलोड करून नोंदणी करावी लागते. या वॉलेटमध्ये एकावेळी २५ हजार रुपये आणि महिन्याला ५० हजार रुपयेपर्यंत रक्कम भरता येते. प्रवास संपल्यानंतर उरलेली रक्कम परत आपल्या परदेशी खात्यात घेता येते.
या उपक्रमामुळे परदेशी पर्यटकांना भारतातील डिजिटल पेमेंट प्रणालीचा अनुभव घेता येणार असून भविष्यात आंतरराष्ट्रीय डिजिटल पेमेंट अधिक सोपे आणि जलद होण्यास मदत होणार आहे.



