Home आरोग्य आचेगावमध्ये पाणीटाकीजवळ अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका

आचेगावमध्ये पाणीटाकीजवळ अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव परिसरातील आचेगाव येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ आढळून आलेल्या गंभीर अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे. टाकीजवळ उघडी गटारे, साचलेले दूषित पाणी आणि कचऱ्याचे ढीग असल्याने परिसरात जंतू, किडे आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला असून संभाव्य साथीच्या आजारांचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिकांच्या मते, पिण्याच्या पाण्याच्या स्रोताजवळच अशा प्रकारची घाण साचलेली असणे अत्यंत धोकादायक आहे. दूषित पाण्यामुळे टायफॉईड आणि हैजा यांसारखे आजार पसरण्याची शक्यता असून, डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे डेंग्यू आणि मलेरियाचा धोका अधिक तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा तोंडी तक्रारी केल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष वाढत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पिण्याच्या पाण्याशी थेट संबंधित असलेल्या या समस्येकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

परिसरातील नागरिकांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. उघड्या गटारांची साफसफाई करून साचलेले दूषित पाणी हटवावे, संपूर्ण परिसर निर्जंतुक करून डास नियंत्रणासाठी औषध फवारणी करावी, तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता व देखभाल सुनिश्चित करावी, अशा मागण्या पुढे येत आहेत. या मागण्यांकडे वेळेत लक्ष दिले नाही, तर येत्या काळात मोठे आरोग्यसंकट निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound