Home प्रशासन नगरपालिका सावदा नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदी फिरोज खान पठाण, स्वीकृत नगरसेवकपदी सुरज परदेशी व सुनील...

सावदा नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदी फिरोज खान पठाण, स्वीकृत नगरसेवकपदी सुरज परदेशी व सुनील जंगले यांची निवड


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक पदांसाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत सर्व निवडी बिनविरोध झाल्याने शहराच्या राजकारणात स्थैर्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शांततेत व लोकशाही मार्गाने पार पडलेल्या या प्रक्रियेमुळे नगरपालिकेच्या पुढील कारभाराला दिशा मिळणार असल्याचे चित्र आहे.

उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी–शिवसेना महायुतीचे उमेदवार फिरोज खान पठाण यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या पदासाठी महायुतीतर्फे शिवसेनेचे फिरोज खान पठाण तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) यांच्यातर्फे सिमरन वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. माघारीची अंतिम वेळ सकाळी ११.४५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती.

दरम्यान, महायुतीत सहभागी झालेले अपक्ष उमेदवार श्याम अकोले यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी सिमरन वानखेडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती केली. या विनंतीला मान देत सिमरन वानखेडे यांनी आपला अर्ज माघारी घेतला. परिणामी फिरोज खान पठाण यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

याचवेळी सावदा नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठीही निवड प्रक्रिया पार पडली. भारतीय जनता पार्टी–शिवसेना युतीतर्फे महेश अकोले आणि सुरज परदेशी यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र गटनेत्या सौ. रंजना भारंबे यांनी महेश अकोले यांचा अर्ज मागे घेतल्याने सुरज परदेशी यांची स्वीकृत नगरसेवक पदी बिनविरोध निवड झाली.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) यांच्यातर्फे सुनील जंगले यांचा स्वीकृत नगरसेवक पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यामुळे दोन्ही गटांकडून स्वीकृत नगरसेवक पदांवर कोणताही वाद न होता एकमताने निर्णय झाला.


Protected Content

Play sound