अरूणदादा पाटील यांची जिल्हा बँक संचालकपदी बिनविरोध निवड ( व्हिडीओ )

जळगाव, संदीप होले | जिल्हा बँक निवडणुकीत रावेर तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातील उमेदवार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अरूणदादा पाटील यांना राजीव पाटील यांनी जाहीर पाठींबा दिला आहे. आज राजीव पाटील यांनी त्यांना जाहीर पाठींब्याचे पत्र प्रदान केले आहे.

 

जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात अनेक नाट्यमय घटना घडल्या. यात यावल आणि रावेरच्या जागेबाबत बराच काथ्याकुट करण्यात आला. अखेरच्या क्षणाला महाविकास आघाडीने जनाबाई गोंडू पाटील यांना कॉंग्रेसच्या कोट्यातून उमेदवारी जाहीर केली. तर कॉंग्रेसचेच राजीव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार अरूण पांडुरंग पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज कायम ठेवले. यात अरूण पाटील यांना थेट भाजपनेच पुरस्कृत केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

 

दरम्यान, माघारीची मुदत उलटून गेल्यानंतर जनाबाई गोंडू महाजन यांनी दोन दिवसांपूर्वीच अरूण पांडुरंग पाटील यांना पाठींबा दिल्याने खळबळ उडाली. तर आज दुसरे उमेदवार राजीव पाटील यांनी देखील अरूण पाटलांना पाठींब्याचे पत्र दिले आहे. यामुळे रावेर तालुका सोसायटी मतदारसंघातून अरूण पांडुरंग पाटील यांनी बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे.

 

या संदर्भात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अरूण पाटील आणि राजीव पाटील यांच्यासह जिल्हा बँक संचालक संजय पवार यांची देखील उपस्थिती होती. याप्रसंगी राजीव पाटील यांनी माघारीबाबतची भूमिका स्पष्ट केली. तर अरूण पाटील म्हणाले की, आपण दोनचा आमदार होतो. तसेच सहकारातही अनेक पदे भूषविली आहेत. २००५ साली जिल्हा बँक संचालक म्हणून अल्प काळ काम करण्याची संधी मिळाली. २००८ साली मला जिल्हा बँक निवडणुकीत फक्त चार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या अनुषंगाने गेल्या एक वर्षापासून आपण तयारी करत आहोत. मात्र महाविकास आघाडी पॅनलमध्ये स्थान मिळण्यात अडचणी आल्या. मात्र, आधी जनाबाई गोंडू महाजन आणि नंतर राजीव पाटील यांनी माघार घेतल्यामुळे आपला विजय निश्‍चीत झाला आहे. यापुढे आपण शेतकरी हितासाठी कार्य करत राहू अशी ग्वाही अरूण पाटील यांनी याप्रसंगी केली.

 

खालील व्हिडीओजमध्ये बघा ही संपूर्ण पत्रकार परिषद

 

Protected Content