
उन्नाव (उत्तर प्रदेश) उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सामूहिक बलात्कार पीडितेला मारहाण करत जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने ज्या सहा जणांवर बलात्काराचा आरोप केला आहे, त्यांनीच महिलेवर हल्ला करत हे कृत्य केले आहे. या घटनेमुळे उन्नावसह संपूर्ण देश हादरला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आज (गुरुवारी) पहाटे चार वाजता रायबरेलीला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी बैसवारा बिहार रेल्वे स्थानकात जात असताना ही घटना घडली. गौरा फाट्यावर गावातील हरिशंकर त्रिवेदी, किशोर शुभम, शिवम, उमेश यांनी पीडितेला घेरले आणि तिच्या डोक्यावर काठी आणि गळ्यावर चाकूने वार केले. दरम्यान, चक्कर आल्याने पीडिता खाली कोसळली. त्यानंतर या सहा जणांनी तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले, अशी माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास रायबरेली पोलिसांनी केला होता. या प्रकरणाचा हे आरोपी जामिनावर सुटले आहेत. दरम्यान, पिडीत महिलेला उन्नाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर कानपूर येथील एलएलआर रुग्णालयात हलवण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी ६ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काल देशाचे गृहमंत्री (अमित शहा) आणि आज मुख्यमंत्री (योगी आदित्यनाथ) हे खोटे बोलले आहेत. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली झाली असल्याचे ते म्हणाले. दररोज अशा प्रकारच्या घटना घडताना पाहून संताप येतो. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आता खोट्या प्रचारातून बाहेर पडायला हवे, असेही प्रियांका गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे.