मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सने निर्देश दिल्यानंतरच राज्यात अनलॉक होणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.
कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट होत असताना महाराष्ट्रात संपूर्ण अनलॉक जाहीर करण्याची तयारी चाललेली आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत विधाने केली आहेत. मात्र यासाठी केंद्रीय कोविड टास्क फोर्सची मंजूरी आवश्यक असल्याची माहिती समोर आली आहे. टास्क फोर्सशी संपूर्ण सांगोपांग चर्चा करण्यात आल्यानंतरच याचा निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे यासाठी किमान काही आठवडे तरी वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.
आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले, नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही राज्य ‘अनलॉक’च नव्हे तर ‘मास्क फ्री’ही करण्याबाबतची चर्चा दोन्ही अंगांनी केलेली आहे. महाराष्ट्रात लवकरच संपूर्ण अनलॉक जाहीर करण्यासाठी केंद्र आणि राज्य कोव्हिड टास्क फोर्सकडून सल्लाही मागितला गेला आहे. प्रतिबंधात्मक, बचावात्मक उपायांचे पालन करायला हवे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.