मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभेत विरोधी पक्षनेता नाही व महाराष्ट्रातही तो ठेवायचा नाही. हे काही मंडळींनी ठरवले असेल तर देशाचे अस्तित्व आणि लोकशाहीला ते मारक ठरेल, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून पक्ष बदलावरून रोकठोक मत मांडले आहे.
सामानाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, काँग्रेस-राष्ट्रवादीमधून मोठ्या संख्येने नेते शिवसेना-भाजपत येत आहेत, याचा आनंद आहे. पण यामुळे विरोधी पक्षनेताच उरणार नाही.’काही वर्षांपूर्वी राजकारणात अस्पृश्य ठरलेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाबाहेर लोक रांगे लावून उभे आहेत. जे रांगेत आहेत त्यापैकी काही लोकांनी अनेकदा पक्ष सोडला आहे. त्यामुळे आजचे आयाराम हे उद्या गयाराम होणार नाहीत याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर जिंकून येण्याची पाच टक्के जरी खात्री असती तरी यापैकी कुणीच भाजप-शिवसेनेत सरकले नसते. काँग्रेस व राष्ट्रवादी हा ज्यांच्यासाठी कालपर्यंत स्वर्ग होता ते सगळे नव्या स्वर्गाच्या दारात रांग लावून उभे आहेत. स्वर्ग बदलण्याची स्पर्धा लोकशाहीचा नरक करील, अशा शब्दात राऊत यांनी आपला उद्वेग व्यक्त केला आहे. विरोधी पक्ष नसेल तर देश कमजोर व लोकशाही ठिसूळ होते. राजकारण एकतंत्री बनते, असे राऊत यांनी म्हटले आहे.
‘राऊत यांनी कॉंग्रेसची तोंडभरून स्तुती देखील केली आहे. पंडित नेहरू व काँग्रेस यांच्या बाबतीत मतभेद असू शकतात, पण संसदीय लोकशाहीतील परंपरांचा त्यांनी मान राखला. स्वातंत्र्यानंतरच्या संसदेत काही संकेत, परंपरा आणि प्रथा प्रामुख्याने काँग्रेसने निर्माण केल्या. लक्षवेधी सूचना ही संसद आणि विधिमंडळातील पद्धत काँग्रेसची देणगी आहे. कामकाज सल्लागार समिती (बिझनेस ऍडव्हायझरी कमिटी) निर्माण झाली काँग्रेसमुळेच. इतर कोणत्याही देशात या दोन गोष्टी नाहीत. विरोधी पक्षाचे महत्त्व पंडित नेहरूंनीच वाढवले,’ अशा शब्दात राऊत यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीचे वर्णन केले.