पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे सेवानिवृत्त पोस्टमास्तर यांच्या बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून १ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व ३७ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त पोस्टमास्तर सुभाष फकिरा मोरे यांचे जारगाव येथील सिद्धीविनायक नगरमध्ये नाथ मंदिरासमोर घर आहे. ते आपल्या पत्नीसमवेत २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता लग्नसमारंभासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:३० वाजता घरी परतल्यानंतर त्यांनी घराच्या बाहेर असलेल्या चप्पल स्टॅंडवर कुलूप पडलेले आढळले. तसेच घराचा कडी-कोंडा तुटलेला होता.
घरात प्रवेश केल्यानंतर सर्व सामान अस्ताव्यस्त दिसले. त्यांनी कपाट तपासल्यावर ५० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, प्रत्येकी ८ ग्रॅम वजनाच्या ४० हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १० हजार रुपये किंमतीचे चांदीची समई, अगरबत्ती स्टॅंड, ताटली, लक्ष्मीचे कॉईन आणि ३७ हजार रुपये रोख असा १ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
तत्काळ त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे पुढील तपास करीत आहेत. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.