संयुक्त राष्ट्रे भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे


संयुक्त राष्ट्र (वृत्तसंस्था) पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसलळेली आहे. या हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात येत आहे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही या हल्ल्याविरोधात भारताला साथ मिळू लागली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनेही हा हल्ला अक्षम्य आणि भ्याड असल्याचे सांगत या हल्ल्याचा निषेध केला आहे. सुरक्षा परिषदेने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख करत अशा निंदनीय हल्ल्यातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा सुरक्षा परिषदेने व्यक्त केली आहे.

संयुक्त राष्ट्रांमध्ये पारित करण्यात आलेल्या या प्रस्तावाचे वैशिष्ट्य म्हणजे या सुरक्षा परिषदेने आपल्या प्रस्तावामध्ये दहशतवादी मसूद अझहर याच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख केला आहे. या सुरक्षा परिषदेमध्ये चीनचाही समावेश आहे. तसेच मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीबाबत चीनने याआधी नकाराधिकाराचा वापर केलेला होता. पुलवामा हल्ल्याला कारणीभूत ठरलेल्यांविरोधात कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला सहकार्य करावे, असे आवाहनही सुरक्षा परिषदेने केले आहे

Add Comment

Protected Content