जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नियोजन भवन, जळगाव येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक घेऊन जळगाव जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती घेतली. विशेषतः शहरात वसतीगृहांसाठी वाढती मागणी लक्षात घेऊन, त्यांनी जळगावसारख्या महानगरात नवीन वसतीगृहे उभारण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे स्पष्ट निर्देश दिले. बैठकीस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, प्रकल्प अधिकारी राजू लोखंडे, सहायक आयुक्त योगेश पाटील तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, शिष्यवृत्ती योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, आवास योजना आणि इतर योजनांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारच्या अनुदानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून अधिकाधिक लाभार्थी अर्ज करतील. त्याचप्रमाणे, ऍट्रॉसिटी प्रकरणांवर प्रभावी कार्यवाहीसाठी जनजागृती आवश्यक असल्याने लोककला व सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देण्याचे त्यांनी सुचवले.
बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील योजनांची माहिती सादर केली, तर पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी ऍट्रॉसिटी प्रकरणांची सद्यस्थिती स्पष्ट केली. सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी विभागाचे सविस्तर सादरीकरण करत कामकाजाची माहिती दिली. शेवटी, जळगाव जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाचे कार्य समाधानकारक असल्याचे नमूद करत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भविष्यातील योजनांसाठी केंद्र सरकारकडून सहकार्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.